रोजी
Health
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"नमस्कार" तुम्ही म्हणत असाल हा निर्जीव दगड कधीपासून बोलायला लागला, हो निर्जीवच कि शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे माझी वाढही होत नाही आणि मी श्वास हि घेत नाही आणि मला हलता हि येत नाही,कारण शेवटी मी दगड आहे, आज मी तुम्हाला माझ्या सोबत घडलेला एक अनुभव सांगणार आहे, दगडाचे मनोगत जाऊद्या हा अनुभव म्हणा हवा तर, गर्वाने,भावनेने, आसवांनी भरलेला अनुभव.
मी गेली कित्येक शतके एका डोंगरावर काढली , न हालचाल करता ऊन,पाऊस,वारा अशी ऋतू पहिली, झाड,झुडपं,पशु, पक्षी पहिले कित्तेत राजे महाराजे पाहिले, गर्द दात जंगलं पाहिली आणि त्या जंगलाची झालेली कत्तल देखील पाहिली,कडाडून गडगडणार आकाश पाहिलं. अशेच दिवस आले आणि गेले मी तसाच होतो स्तब्ध आणि निपचित दगडांच्या असंख्य ढिगाऱ्यात असणारा मी माझी किंमत ती काय असणार. आता माझ्या भोवताली पहिल्या सारख जंगल राहील नव्हतं उदास वाटणारे वातावरण आणि रखरखणारे ऊन माझ्या माथ्यावर मी रोज झेलायचो. मेंढपाळ, गुराकडे आलेली लोकं तर माझ्या अंगावर बसत होती माझ्यावर तंबाखूच्या पिचकाऱ्या टाकून मला लाल करत होती,तर कोणी विनाकारण दोन्ही पाय नेटाने माझ्या अंगावर लाऊन आहे तेव्हडे बळ लाऊन मला ढकलण्याचा प्रयत्न करत होती, कसला तो मूर्खपणा,खूप राग यायचा हो दगड असलो मग काय झालं? हा सगळा अपमान मला असह्य झाला होता पण करणार काय मला हलता हि येत नव्हते आणि बोलता हि येत नव्हते निपचित पडून राहण्याखेरीज माझ्याकडे मार्गही नव्हता. एक दिवस मात्र धोधो पाऊस पडू लागला झाड झुडपं वेली याना आपल्या थेंबानी झोडपून काढू लागला जणू कशाचा तरी रागच काढत होता "मला हि असा राग काढता असता तर" किती वेळ झाला त्या रप रप पडणाऱ्या थेंबानी जणू अविरत पडण्याचा ठेकाच घेतला होता जस जसा पावसाचा जोर वाढत होता माझ्या खाली असलेली माती सरकू लागली होती, पाण्याचा लोढा धोधो वाहत होता आणि अचानक मला जाणवलं आता मला कशाचाही आधार राहिला नव्हता मी मी धड धड करत लोटांगण घालत वेगाने त्या डोंगरावरून खाली येत होतो मध्ये येणारे रोपटे बारीक दगड कशाला हि न जुमानता मी धड धड आवाज करत,एखाद्या दगडावर आदळून उंच उडून पुन्हा वेगाने खालच्या दिशेला जात होतो, शेवटी खाली येऊन एका सपाट जागी मी थांबलो आणि अरे बापरे म्हणत त्या डोंगरावर पाहत होतो, पाऊस ओसरला पाखर पुन्हा चिलबिल करू लागलि होती, मी एका गावाच्या बाजूला येऊन पोहोचलो होतो पुन्हा मानस पाहिली आणि तो अपमान आठवला, असेच दिवसामागून दिवस गेले आणि एक दिवस मात्र काही लोक भलीमोठी हातोडी गाड्या ट्रॅक्टर घेऊन माझ्या दिशेला येत होते, त्यातला एक जण मला न्याहळत होता जणू काही शोधत होता, त्याने पाहिलं आणि बाकी लोकांना म्हणाला उचला हे ऐकून तर पायाखालची जमीनच सरकली आता हे काय नवीन संकट आधी पाऊस आता हे माणसं काय होणार देव जाणो, त्या सर्वांनी मला उचललं आणि घेऊन गेले, गावात एका मोठ्या झाडाखाली त्यांनी मला आणलं, आणि तो माणूस जो मला न्याहळत होता त्यांनी त्याच्याकडं असलेले तीक्ष्ण हत्यार माझ्यावर मारायला सुरुवात केली, त्याने मारलेल्या प्रत्येक ठोक्यासोबत खण खण आवाज येत होता तस तसे माझ्या अंगावर असलेल्या दगडी खापरांचे तुकडे उडत होते, गेली काही दिवस त्या माणसाचे असेच चालू होते, एक दिवस पुन्हा माणसं आली आता तर सर्वच जण माझ्याकडे पाहत होती, कोणी डोळे मोठे करत होत तर कोणी पाहून वाह वाह करत हसत मान हलवत होते, त्या सर्वांनी ठीक आहे म्हणत त्या माणसाला दाद दिली आणि तो निघून गेला, मला मात्र काहीच समजत नव्हते, त्यानंतर डोक्यावर केस नसलेला एक माणूस आला आणि आणा रे पाणी म्हणत माझ्या अंगावर पाण्याच्या घागरी रिकाम्या करू लागला, पांढरे पाणी कोणी त्याला दूध म्हणत होते तर कोणी दही म्हणत होते ते तर मी कधी पहिले सुद्धा नव्हते ते माझ्या अंगावर ओतू लागले तसा मी बधिर होऊन नेमके काय चालु आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो, शेवटी त्या व्यक्तीने लाल माती सारखा काहीतरी धूळी सारखा पदार्थ माझ्या अंगावर लावला आणि हात जोडले आणि मी आवाक झालो नक्की काय झाले आहे तेच कळेना, गावातील सर्व लोक यायची तो लाल पदार्थ लावायची आणि माझ्यासमोर डोकं ठेऊन काहीतरी मागायची न निघून जायची, या आधी ते मेंढपाळ जे माझ्या अंगावर बसायचे थुंकायचे दोन्ही पायांनी मला ढकलू पाहायचे ते सर्वजण आता माझ्यासमोर डोकं टेकवत होती , हे पाहून मी मात्र खुश झालो, माझा अपमान करणारे आता माझ्यासमोर डोकं टेकवत होते, मला लाथ मारणारे आता कोणी नव्हते, अन माझ्यावर थुंकण्याची हिम्मत देखील कोणात नव्हती, मी खात नाही पित नाही तरी लोक त्यांचे जेवण माझ्या समोर आणून मांडत होती काहीतरी माझ्या अंगावर चिकटवत खा म्हणत होती काय तो प्रसंग, आणि काही लोक तर बिचारी मला जेवायला दे म्हणून माझ्यासमोर हात जोडत रडत असायची मग माझ्यासाठी लोक जे अन्न आणतात ते त्यांना का देत नसावेत हा प्रश्न मला पडायचा जे मी खात नाही ते जे खात आहे त्याला देण्यात काय वाईट आहे हे काही मला समजत नव्हते, एक दिवस एक बाई एका बाळाला घेऊन माझ्यासमोर आली आणि जोर जोरात ओरडू लागली माझ्या बाळाला बर कर आणि मी हताश झालो, तिचा आकांत तिच्या डोळ्यात असलेल्या पाण्याच्या धारा त्या दिवशी पडलेल्या पावसापेक्षा हि भयानक होत्या, ती आर्त हाकेने माझ्याकडे पाहून आवाज देत होती उठ जागा हो, निर्दयी, पाषाण,अशा अनेक नावानी ती माझ्याकडे पाऊण उठ म्हणत होती, पण मी कसा उठणार जेव्हा ती मेंढपाळ माझा अपमान करत होते तेव्हा हि मी उठू शकलो नाही आणि आजही मी उठू शकणार नव्हतो कारण मी "दगड" होतो, कित्येक शतकापासून खितपत पडलेला मी लाल धूळ लाऊन फक्त जागा बदलून इथे उभा आहे,मला आणून उभा केले आहे, त्या लहान मुलाला गरज होती ती वैद्यांची माझी नाही मी काहीच करू शकत नाही आणि शकणार हि नाही. एव्हडे दिवस माझा अपमान करणारी लोक माझ्या समोर डोकं टेकवतात म्हणून मी खुश होतो पण आज मात्र मी खिन्न आणि निराश झालो होतो. मी निर्जीव असूनही ते माझ्यात जीव शोधात होते,आणि मी काहीच करू शकत नव्हतो, ती बाई ओरडून ओरडून तुझं तोंड पाहणार नाही अस म्हणून निघून गेली. आणि मी पाहतच राहिलो. मी कित्तेक शतकांपासून त्या डोंगरावर होतो कित्येकांनी माझा वेगवेगळ्या प्रकारे अपमान केला मी काहीच करू शकलो नाही, आणि आज ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणावरून हि मी काहीच करू शकत नाही, फक्त लाल धूळ लाऊन कोणी माझ्यात जीव टाकू शकत नाही माझा इतिहास बदलू शकत नाही. त्या वेळी वैद्य हाच खरा तिचा देव होता.
माणसा पेक्षा त्याच्या जीवपेक्षा एक दगड कधीच मोठा असू शकत नाही प्रभू श्री कृष्ण सांगतात, मानव आत्मा हि माझा अंश आहे शेवटी ती माझ्यातच विलीन होणार आहे, माणसं जपा, मानवता जपा, खरा देव माणसात आहे,
बाबा आमटे यांनी माणसात देव पाहिला, मदर तेरेसा यांनी माणसात देव पाहिला,म्हणून ते आता अमर आहेत.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात जमीन आसमानाचा फरक आहे,श्रद्धा मनामध्ये हवी, मानवता सर्वांगात हवी,
.................ले- प्रविणकुमार सांगळे.........